नूह : हरयाणा राज्यातील नूह जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारांनी देशभरातील लोकांना १०० कोटी रुपयांना गंडा घातला आहे. ही धक्कादायक माहिती हरयाणा पोलिसांनी नूहमध्ये टाकलेल्या धाडींतून उघड झाली. तेथील ठकसेनांनी दिल्ली, उत्तर प्रदेशपासून अंदमान निकोबारपर्यंतच्या रहिवाशांना फसविले आहे. त्यांच्याकडून लुबाडलेले पैसे बनावट बँक खात्यांत जमा करण्यात येत असत. नूहच्या सायबर गुन्हेगारांची देशभरातील २८ हजार प्रकरणे आता उजेडात आली आहेत.
सायबर गुन्हेगार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आकर्षक प्रोफाईल तयार करून सेक्सटोर्शनद्वारे पीडितांची फसवणूक करत असत. पीडितांना व्हिडिओ चॅटवर येण्याचे आमिष दाखवत, जिथे ते पीडितांना आक्षेपार्ह स्थितीत स्क्रीन रेकॉर्ड करायचे आणि नंतर त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करायचे, असे पोलिसांनी सांगितले.
फसवणूक पद्धती...
फेसबुक बाजार, ओएलएक्स आदी ठिकाणी बाइक, कार, मोबाइल फोनसारख्या उत्पादनांवर आकर्षक ऑफर असल्याचे भासविण्यात येत. ‘उत्पादनाचे घरातून काम करा, दर महिना ३० हजार रुपये कमवा’ अशा जाहिरातीदेखील या गुन्हेगारांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्या जात. त्यातूनही ते लोकांकडून पैसे उकळत होते.