High Court on Extra Marital Affaire: खबरदार! जोडीदाराच्या चारित्र्यावर खोटे आरोप लावाल तर; उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 08:54 AM2022-03-24T08:54:44+5:302022-03-24T08:55:02+5:30
2014 साली लग्न झाल्यानंतरच दोन्ही पक्षांमधील परस्पर संबंध बिघडले होते. 2017 मध्ये, पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला, जो 2019 मध्ये मंजूर झाला. ही महिला सामाजिक विज्ञान शिक्षिका आणि तिचा पती हा एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर असल्याचे सांगितले गेले.
जोडीदारावर चारित्र्यहीनतेच्या आरोपांची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली आहे. नात्यातील विवाहबाह्य संबंधाचे आरोप गंभीर असतात, ते गांभीर्यानेच घेतले पाहिजेत असे म्हटले आहे. विवाह हे पवित्र नाते असून निरोगी समाजासाठी त्याची शुद्धता राखणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने मांडले आहे.
न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांच्या खंडपीठाने एका महिलेचे अपील फेटाळताना आपल्या निकालात ही निरीक्षणे नोंदवली. पतीने महिलेच्या क्रूरतेवरून कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. महिला पतीच्या चारित्र्यावर संशय घेत होती, यामुळे न्यायालयाने त्यांना घटस्फोट दिला होता. याविरोधात महिलेने दिल्ली उच्च न्यायालयात अपिल केले होते.
2014 साली लग्न झाल्यानंतरच दोन्ही पक्षांमधील परस्पर संबंध बिघडले होते. 2017 मध्ये, पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला, जो 2019 मध्ये मंजूर झाला. ही महिला सामाजिक विज्ञान शिक्षिका आणि तिचा पती हा एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर असल्याचे सांगितले गेले.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने म्हटले की, अपिल करणाऱ्या महिलेने पतीवर गंभीर आरोप लावले आहेत. मात्र, सुनावणीवेळी यातील एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. सासऱ्याविरोधात देखील जो गंभीर आरोप केलेला तो देखील सिद्ध झाला नाही. लग्न हे एक पवित्र नाते आहे, त्याची शुद्धता ठेवण्याची गरज आहे, अशाप्रकारे चारित्र्यावर खोटे आरोप करणे ही क्रूरता आहे. यामुळे कौटुंबीक न्यायालयाच्या निर्णयामध्ये दखल देण्याचे आम्हाला काहीही कारण दिसत नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
पती आणि त्याच्या वडिलांवर बिनबुडाचे आरोप करणे म्हणजे त्यांच्या चारित्र्याची हत्या आहे, जे पतीवरील मानसिक क्रूरता दर्शवते. पती-पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप हे त्याचे चारित्र्य, दर्जा, प्रतिष्ठा आणि आरोग्यावर गंभीर आघात असल्याचे वारंवार सांगण्यात आले आहे. यामुळे मानसिक यातना आणि त्रास होतात आणि ते क्रूरतेसारखे आहे, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे.