नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात अपुरा पाऊस झाल्यामुळे मनरेगांतर्गत अतिरिक्त ५० दिवसांचे काम पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) कार्डधारकांना शंभर दिवसांचे काम दिले जाते. देशभरात पावसाची तूट १५ टक्क्यांवर गेल्याने खरीप पिकाला जबर फटका बसल्यामुळे ग्रामीण भागात रोजगार वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला.कर्नाटकने याआधीच ३० पैकी २७ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांनाही दुष्काळाची मोठी झळ पोहोचली आहे.दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या ग्रामीण भागात चालू आर्थिक वर्षात अतिरिक्त ५० दिवसांची कौशल्यरहित कामे निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बेरोजगारीवर मात- ग्रामीण भागात दुष्काळाची स्थिती असताना बेरोजगारीमुळे आलेले नैराश्याचे वातावरण दूर करण्याचा प्रयत्न करताना ग्रामीण भागातील गरिबांना लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध राज्यांमध्ये अतिरिक्त रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.-अनेक राज्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी पावले उचलली आहेत, अशी माहितीही प्रसाद यांनी दिली.
दुष्काळी भागात अतिरिक्त काम
By admin | Published: September 17, 2015 1:09 AM