मुंबई - माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्ष सोडणार असून भारतीय जनता पक्षात जाणार नसल्याचं माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं होतं. तसेच, सिंग यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढणार असल्याचंही सांगितलं. आता, कॅप्टन सिंग यांनी आपल्या नवीन राजकीय पक्षाच्या नावाची घोषणा केली आहे. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपला पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या पत्रात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.
कॅप्टन सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे यासंदर्भातील पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेसचाही राजीनामा देणार असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच, 'पंजाब लोक काँग्रेस' नावाने नवीन पक्षाची घोषणाही केली. तसेच, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर जोरदार प्रहार केला.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नव्या पक्षाचीही घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या पक्षाला पंजाब लोक काँग्रेस असं नाव दिलं आहे. आपण पंजाबमधील सर्व ११७ जागा लढवू असंही त्यांनी सांगितलं होतं. याशिवाय भाजपसोबत युती केली जाईल का नाही यावरही त्यांनी भाष्य केलं होतं. "मी भाजपसोबत युती करण्याबाबत कधीही वक्तव्य केलं नव्हतं. आम्ही सीट शेअर करू शकतो. याबाबत भाजपशी चर्चा झाली नसली तरी यावर विचार करत आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
पंजाबमधील शेतकऱ्यांना सोबत घेऊन लवकरच एका राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचे कॅप्टन सिंग यांनी सांगितले होते. जर शेतकऱ्यांचा विरोध शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात निर्णयात येईल, तर पुढील 2022 ची विधानसभा निवडणूक भाजपसोबत आघाडीची आशा आहे, असेही सिंग यांनी म्हटले होते.
डोवाल यांचीही घेतली होती भेट
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत सुरक्षेबद्दल काही विषयांवर चर्चा झाली. त्यात संवेदनशील मुद्द्यांचा समावेश असल्यानं त्यावर भाष्य करू शकत नाही, असं सिंग यांनी सांगितलं. सिद्धू पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. त्यांनी राज्यातल्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तरीही मी त्यांना जिंकू देणार नाही, असं सिंग म्हणाले. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळीही पंजाब काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष होते. मात्र सिद्धूंनी जे केलं, ते आधी कोणीही केलेलं नाही, असं सिंग यांनी म्हटलं.