नवी दिल्ली : लोकसभेत सोमवारी पुन्हा ललितगेट प्रकरणावरून गदारोळ सुरू असताना पंजाबातील गुरदासपूर येथील अतिरेकी हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले. या मुद्यावर केलेली चर्चेची मागणी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी फेटाळताच विरोधकांनी जोरदार नारेबाजी करीत सभागृह दणाणून सोडले.प्रारंभी कामकाज तहकूब झाल्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या सदस्यांनी ललित मोदी प्रकरणावरून पुन्हा गोंधळ घातला. सभागृहात विविध घोषणा लिहिलेली फलके आणत घोषणा सुरू असताना महाजन यांनी आवश्यक दस्तऐवज पटलावर ठेवत कामकाज सुरू केले. शून्य तासाला संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांनी दहशतवादी हल्ल्याची माहिती दिल्यानंतर गदारोळ सुरू झाला. भाजपासह शिरोमणी अकाली दल, बीजद, तेलंगणा राष्ट्र समितीच्या सदस्यांनी गुरदासपूरमधील हल्ला गंभीर बाब असल्याचे नमूद करीत चर्चेची मागणी केली. यावेळी नायडू यांनी काँग्रेसच्या सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. गृहमंत्री राजनाथसिंग निवेदन देतील असे आश्वासनही त्यांनी दिले; मात्र काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवला.
लोकसभेत अतिरेकी हल्ल्याचे तीव्र पडसाद
By admin | Published: July 28, 2015 3:35 AM