पणजी : इंडियन मुजाहिद्दीनचा (आयएम) खतरनाक अतिरेकी सईद इस्मायल अफाक याने गोव्यात पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्याचे त्याच्या चौकशीतून उघड झाले आहे. अफाकला ८ जानेवारी २०१५ मध्ये कर्नाटकमधील बंगळुरू येथे अटक करण्यात आली. सध्या तो बंगळुरू येथे कोठडीत आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणेने अफाकच्या केलेल्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. बंगळुरु येथील प्रशिक्षकाकडून त्याने पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्याचे त्याने सांगितल्याचा उल्लेख ‘एनआए’ या तपास संस्थेच्या आरोपपत्रात आहे.गोव्यात पॅरा ग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अफाकने अमेरिकेतून दोन पॅराग्लायडिंग किट्स सुद्धा खरेदी केली होती. परंतु त्यानंतर त्याने गोव्यात पुन्हा पॅराग्लायडिंग केले की नाही, याबद्दल ‘एनआयए’ला माहिती मिळाली नाही.अतिरेकी त्रिकुटापैकी जानेवारीत अफाब आणि अबदस सबुर यांना बंगळुरू येथे अटक झाली होती. तर सद्दाम हुसेन यास कर्नाटकमधील भटकळ येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर ‘एनआयए’कडून त्यांची चौकशी सुरू झाल्यानंतर अफाकच्या गोव्यातील वास्तव्याबद्दल माहिती उघड झाली. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर पॅराग्लायडर्सवरही नजर ठेवण्याच्या सूचना राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्या आहेत. गोव्यात अतिरेकी येऊन पाच दिवस प्रशिक्षण घेऊन गेल्याचा ठावठिकाणा येथील पोलीस यंत्रणांना तर लागलाच नव्हता. एवढेच नव्हे तर प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकालाही त्याची कल्पना नव्हती, अशी माहिती ‘एनआयए’च्या सूत्रांकडून देण्यात आली.
अतिरेक्याचे गोव्यात प्रशिक्षण!
By admin | Published: September 07, 2015 12:34 AM