कोलकाता : भाजपप्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार या एक्झिट पोलच्या निष्कर्षांमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. जनमताचा नेमका कौल कोणाच्या बाजूने आहे, याचे मतदारसंघ, जिल्हावार अहवाल या पक्षाला त्याच्या नेत्यांनी पाठविले आहेत. त्याचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेण्याबाबत खल सुरू आहे.
पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, एक्झिट पोलचे निष्कर्ष बिनबुडाचे असून, भाजपच्या बाजूने झुकणारे आहेत. या निष्कर्षांना आम्ही फार महत्त्व देत नाही. लोकसभा निवडणूक निकालांनंतर नेमकी काय भूमिका घ्यायची, याबाबत अन्य विरोधी पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. या निवडणुकांत भाजपचा पराभव होणार हे नक्की आहे.
तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सोमवारी भेट घेऊन निकालानंतरच्या संभाव्य स्थितीबाबत चर्चा केली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २४ व भाजपला १६, तर काँग्रेसला दोन जागा मिळतील. डाव्यांना एकही जागा जिंकता येणार नाही, असा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)अखेरच्या घटका - भाजपएक्झिट पोलच्या निष्कर्षांवर मी विश्वास ठेवत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांना प्रत्युत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव होणार हे अटळ आहे. तृणमूल सरकारही आता अखेरच्या घटका मोजत आहे. लोकसभा निवडणुकांत आपणच जिंकणार, याबाबत तृणमूलचे ज्येष्ठ नेते ठाम असले, तरी त्या पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यांपैकी काही जणांचे मत वेगळे आहे.