- सुहास शेलारजयपूर : मुंबईत मोठ्या प्रमाणात राजस्थानी नागरिक व्यवसाय आणि नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत. मात्र, त्यांची नाळ आजही आपल्या गावाशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी आपली नावे गावातील मतदारयाद्यांमध्येच ठेवली आहेत. भाजपा-काँग्रेच्या नेत्यांनी हे लक्षात घेत, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील राजस्थानी लोकांची मते मिळविण्यासाठी आपला मोर्चा मुंबईकडे वळविला आहे.राजस्थानी लोकांनी आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी मुंबईत आपापल्या समाजाच्या संस्था स्थापन केल्या आहेत. राजपूत, जाट, गुर्जर समाजाच्या संस्थांचे सभासद तर काही हजारांवर आहेत. शिवाय जिल्हा, तालुका, गावनिहाय संस्था व संघटना आहेत. त्यामुळे या लोकांनी जर गावी येऊन मतदानाचा हक्क बजावला, तर मतदानाची टक्केवारी वाढून त्याचा फायदा आपल्या पक्षाला होऊ शकतो, या हेतूने राजकीय नेत्यांनी या संस्थांंना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. कांग्रेसतर्फे अशोक गेहलोत, नीरज डांगी, गिरिजा व्यास; तर भाजपातर्फे ओमप्रकाश माथूर, गुलाबचंद कटारिया यांनी मुंबईत प्रमुख राजस्थानी संस्थांसोबत बैठका घेऊन आपल्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.अशोक गेहलोत व नीरज डांगी यांनी दोनदा येऊन दक्षिण मुंबई व पश्चिम उपनगरांत बैठका घेतल्या. गिरीजा व्यास यांनीही आपल्या एका दौºयाचे निमित्त साधत मुंबईत आपल्या हितचिंतकांची भेट घेतली आहे. भाजपाचे ओमप्रकाश माथूर आणि गुलाबचंद कटारिया यांना मानणारा एक वर्ग मुंबईत आहे. वसुंधरा राजे सरकारच्या काळात या दोन्ही नेत्यांनी काही बड्या व्यापाºयांना राजस्थानात ‘हातपाय पसरायला’ राजकीय व प्रशासकीय पातळीवर मदत केली होती. याचा फायदा या निवडणुकीत त्यांना होऊ शकतो. माथूर आणि कटारिया यांनीही मुंबईत येऊन आपल्या समर्थकांच्या भेटी घेतल्या आहेत. राजस्थानातील प्रचार ५ डिसेंबर रोजी संपल्यानंतर ते पुन्हा मुंबईत आपल्या परिचितांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे.‘वोट’ मिळण्यासोबतच ‘नोट’ मिळण्यासाठीही काही नेत्यांनी मुंबईतील राजस्थानी व्यापाºयांना साकडे घातल्याची चर्चा आहे. निवडणुकीत आर्थिक मदत करण्याच्या मोबदल्यात सरकार स्थापन झाल्यानंतर राजस्थानात व्यापाराचा विस्तार करण्यासाठी विशेषसवलती देण्याच्या अटीवर काही व्यापाºयांनी त्यांना मदत केल्याचीही चर्चा आहे.विशेष म्हणजे मूळ राजस्थानी असलेले मुंबईतील काही व्यापारीही यंदा विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. यात काँग्रेसतर्फे रफिक मंडेलिया (चुरु मतदारसंघ), जसाराम चौधरी (मारवाड जंक्शन); तर भाजपातर्फे ललित ओस्तवाल (बडी सादडी), नारायणसिंह देवल (राणीवाडा), पुराराम चौधरी (भीनमाल), अतुल भंसाळी (जोधपूर शहर) यांचा सामावेश आहे. यापैकी मंडेलिया आणि ओस्तवाल हे मुंबईतील नावाजलेले विकासक आहेत. शिवाय प्रसिद्ध लोखंड व्यापारी जीवाराम चौधरी हे सांचोर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.>मुंबईत उघडले पक्ष कार्यालयराणीवाडा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रतन देवासी यांनी दक्षिण मुंबईतील गिरगावात कार्यालय उघडले आहे. राणीवाडा मतदारसंघात भाजपाने मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी नारायणसिंह देवल यांना रिंगणात उतरवले आहे. देवल यांचा मुंबईस्थित राजस्थानी समाजात फार मोठा दबदबा आहे. शिवाय निवडणुकीसाठी भाजपाला मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य केल्याचीही चर्चा आहे. देवल यांचा हक्काचा मुंबईकर मतदार ‘फोडण्यासाठी’च रतन देवासी यांनी मुंबईत कार्यालय उघडले आहे.>मुंबईकर मतदारांना प्रवास खर्च :मतदारांना मुंबईतून गावी येण्यासाठी त्या-त्या मतदारसंघांतील उमेदवाराकडून प्रवास खर्च देण्याचे आश्वासन दिल्याचे कळते. शिवाय एका उमेदवाराने मुंबई ते मारवाड जाण्यासाठी खासगी बस निवडणुकीच्या आदल्या दिवशी आरक्षित केल्याचेही मुंबईस्थित एका राजस्थानी व्यक्तीने सांगितले.
मुंबईस्थित राजस्थानी मतांवर ‘डोळा’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:58 AM