जम्मू-काश्मीर : भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानाला भारतीय वायुसेनेने बुधवारी पाडले होते. भारतीय वायुसेनेकडून पाडण्यात आलेल्या एफ 16 विमानाचे अवशेष पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले आहेत.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने गेल्या मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताने भारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी बुधवारी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. या लढाऊ विमानांना भारतीय वायुसेनेने प्रत्युत्तर देत पिटाळून लावले. यावेळी भारतीय वायुसेनेला तीन विमानांपैकी एक विमान पाडण्यात यश आले होते. पाडण्यात आलेले पाकिस्तानचे एफ 16 लढाऊ विमान होते.
दरम्यान, भारतीय वायुसेनेकडून पाडण्यात आलेल्या एफ 16 विमानाचे अवशेष गुरुवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले आहेत. यासंबधीचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहेत. यामध्ये पाकिस्ताचे अधिकारी विमान पडलेल्या ठिकाणी अवशेषांची पाहणी करताना दिसत आहे.
याचबरोबर, पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर लेह, जम्मू काश्मीर, श्रीनगर, पठाणकोट आणि अमृतसर येथील विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच चंडीगड आणि श्रीनगर विमानतळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.