नवी दिल्ली - आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. तर, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या सोशल मीडिया साईटवर निवडणूक आयोग आणि प्रशासनाची करडी नजर राहिल. त्याच पार्श्वभूमीवर फेसबुकनेही भारतीय निवडणुकांमध्ये रस घेतल्याचे दिसून येते. फेसबुककडून फेक न्यूजला आळा घालण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. फेक न्यूज आणि आक्षेपार्ह राजकीय मजकूरावर फेसबुकचे लक्ष असणार आहे.
भारतातील निवडणुकांमध्ये फेसबुकनेही रस घेतला आहे. कारण, फेसबुकने काही तज्ञांची टीम नेमली असून ती टीम राजकीय पक्षांसोबत काम करणार असल्याचे ग्लोबल पॉलिसी सोल्यूशनचे उपाध्यक्ष रिचार्ड अलान यांनी सांगितले आहे. फेसबुककडून कंटेट तज्ञ आणि सुरक्षा तज्ञांसह आणखी काही जणांची एक टीम तयार केली आहे. भारतातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही टीम बनविण्यात आली असून निवडणूक काळातील फेक न्यूज आणि आक्षेपार्ह मजूकरांना आळा घालण्यासाठी ही टीम काम करणार आहे. निवडणूक काळातील सत्यता, खऱ्या बातम्या फेक न्यूज आणि अपप्रचार यांमधील फरक करणे, सत्यता शोधणे हे नक्कीच आमच्यासाठी आव्हानात्मक असल्याचेही अलान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कॅम्ब्रीज अॅनॅलिटीका कंपनीला डेटा विकल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला होता. त्यामुळे फेसबुकने 87 कोटी युजर्संचा विश्वासघात केल्याचेही अनेकांनी म्हटले होते. याप्रकरणामुळे फेसबुकला जगभरातून टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर मार्क झुकरबर्ग यांनी सर्व युजर्संची माफीही मागितली होती. त्यामुळे भारतातील आगामी निवडणुकांवर काम करताना फेसबुक अतिशय काळजी घेईल, असेच दिसून येत आहे.