नवी दिल्ली - समाज माध्यमांमध्ये नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे हक्क अबाधित राखण्यासाठी योग्य तो उपाय योजना केल्या जातील, अशी ग्वाही फेसबुकने दिली आहे. बुधवारी फेसबुक, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामचे अधिकारी संसदीय कमिटीसमोर हजर झाले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आपली बाजू संसदीय कमिटीसमोर मांडली. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज संसदीय समितीची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा, नागरिकांच्या गोपनीय माहितीची सुरक्षा या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
संसदीय कमिटीच्या बैठकीदरम्यान फेसबुकच्या कर्मचाऱ्याने पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या टिप्पणीवर फेसबुकने संसदीय कमिटीची माफी मागितली. दहशतवाद आणि पुलवामा हल्ल्याबाबत फेसबुकच्या कर्मचाऱ्याने अभद्र टिप्पणी केली होती.
फेसबुक, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्राम यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर संसदीय कमिटीचे अध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर समाजामध्ये द्वेष आणि फूट पाडण्यासाठी होऊ नये. हिंसा भडकवून देशाला ऐक्याला बाधा पोहचेल, अशा कृत्यांना चाप लावण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहेत. या अधिकाऱ्यांनी भारताच्या सुरक्षेला धोका असेल, तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतंही गैरकृत्य होणार नाही, यासाठी योग्य पाऊले उचलू अशी खात्री दिली.
निवडणुकांच्या काळात भारताच्या निवडणूक आयोगाच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करू. सोबतच योग्य माहिती आणि गरज भासेल तिथे तात्काळ सुधारणा केल्या जातील, असेही फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले