नवी दिल्ली : यापूर्वी कोणत्याही सरकारने सोशल मीडियाचा केला नाही तेवढा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असून त्यांनी फेसबुक हे जनतेशी थेट संवाद साधण्याचे आणि चांगल्या प्रशासनासाठी प्रभावी माध्यम असल्याची प्रशंसा केली आहे. फेसबुकच्या चीफ आॅपरेटिंग आॅफिसर (सीओओ) शेरील सँडबर्ग यांनी मोदी यांची गुरुवारी भेट घेऊन संवाद साधण्यासंबंधी नव्या कल्पनांबाबत चर्चा केली.सोशल मीडियाच्या वापराबाबत सर्वात उत्सुक नेते अशी मोदींची ओळख आहे. भारतात विदेशी पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी फेसबुकचा कसा वापर करता येईल, यावर मी सँडबर्ग यांच्याशी चर्चा केली आहे, असे मोदींनी आपल्या पेजवर नमूद केले आहे. फेसबुक या सर्वात लोकप्रिय नेटवर्किंग साईटचे सीओओ बनल्यानंतर प्रथमच भारतभेटीवर आलेल्या सँडबर्ग यांनी मोदींशी संवाद साधला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
फेसबुक हे सुसंवादाचे प्रभावी माध्यम -मोदी
By admin | Published: July 04, 2014 5:45 AM