ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २३ - आजकाल प्रत्येकजण सोशल मिडियाचा वापर करतो आणि याच सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली प्रत्येक गोष्ट अपडेट करत असतो. मग ते खाण्यापासून ते अगदी आज दिवसभरात काय केलं ती प्रत्येक गोष्ट अपडेट होत असते. फेसबुकवर आपल्याला फिलिंगचा ऑप्शन दिला आहे ज्यामध्ये आपल्या मुडप्रमाणे ऑप्शन निवडता येतो. ज्यामुळे काही न बोलता नेमका तुमचा मुड कसा आहे ते मित्रांना सांगता येत.
मात्र मासिक पाळी सुरु असेल आणि ते फेसबुकवर टाकायचं असेल तर ? अनेक मुली कदाचित नाही म्हणतील. मात्र दिल्लीतल्या आरुषी दुवा या विद्यार्थीनीने मार्क झुकरबर्गला पत्र लिहून 'ऑन माय पिरिअड'चा ऑप्शन सुरु करण्याची विनंती केली आहे. आरुषी दिल्लीत नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये तिस-या वर्षाला शिकत आहे. समाजामध्ये अजूनही मासिक पाळीसंबंधी गैरसमज आहेत. मासिक पाळीसंबंधी सोशल मिडियावरुन मोठ्या प्रमाणात कॅम्पेन सुरु आहे मात्र अजूनही पाळीवरचा ‘टॅबू’ काही हटलेला नाही. आणि त्यामुळेच हा ऑप्शन सुरु करण्याची विनंती आरुषीने पत्राद्वारे केली आहे.
आरुषीने या पत्रात भारतामध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान कशाप्रकारे समस्यांना सामोरं जावं लागतं यासंबंधी लिहिलं आहे. तसचं जुनाट कल्पना आणि पुरुषप्रधान संस्कृतीमुळे अजूनही महिला मासिक पाळीबद्दल बोलण्यास घाबरत असल्यांचंही लिहिलं आहे. अजूनही दुकानातून सॅनिटरी नॅपकिन विकत घेताना महिला लाजते, विकत घेतलं की सगळे जण तिच्याकडे जणू काही आरोपीच असल्यासारखं बघतात असं सांगत मानसिकता बदलण्यासाठी फेसबुकवर 'ऑन माय पिरिअड'चा ऑप्शन सुरु करण्याची विनंती आरुषीने केली आहे.