नवी दिल्ली - दिल्लीतील इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधील (आयआयटी) एका विद्यार्थ्याला फेसबुकने (यूएस) तब्बल 1.45 कोटींच्या पगाराची ऑफर दिली आहे. कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्याला फेसबुकने 1.45 कोटींहून अधिक पगाराच्या नोकरीची ऑफर दिली आहे. दिल्ली सरकारच्या या शैक्षणिक संस्थेची ही आतापर्यंतची विक्रमी प्लेसमेंट असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय दोन विद्यार्थ्यांना 43 लाख आणि 33 लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे.
2020 मध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 310 नोकऱ्यांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांना इंटर्नशीपच्या 252 ऑफर्स मिळाल्या आहेत. दिल्ली सरकारच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे आतापर्यंतचे सरासरी पॅकेज 16.33 लाखांचे होते. यात युजी (पदवीपूर्व) आणि पीजी (पदव्युत्तर) अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हारमन कारडॉन कंपनीने वार्षिक 15 लाख पॅकेजवर सात विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये प्लेसमेंटचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यावेळी आणखी जास्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नोकऱ्यांच्या ऑफर्स विद्यार्थ्यांना येण्याची शक्यता आहे. कॅम्पस प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्यांमध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, फेसबुक, क्वालकॉम, सॅमसंग, रिलायन्स, डब्ल्युडीसी, टॉवर रिसर्च, एनविडिया, एडोबी, गोल्डमॅन सॅश आदी कंपन्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इन्स्टिट्यूटच्या 2021 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करणाऱ्या बीटेक प्री-फायनल बॅचसाठी 108 इंटर्नशीप ऑफर आल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी अब्दुल्ला खान या 21 वर्षीय तरुणाला गुगलने मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिली होती. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या अब्दुल्ला याला गुगलने 1 कोटी 20 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी दिली होती. अब्दुल्ला खान याने मीरा रोड येथील श्री एल. आर. तिवारी इंजिनीअरिंग कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. गुगलने काही काही दिवसांपूर्वी प्रोग्रॅमिंग साइटवर त्याचं 'प्रोफाइल' पाहिलं आणि मुलाखतीसाठी त्याला बोलावून घेतलं होतं. अब्दुल्लाने कम्प्युटर सायन्समधून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. ऑनलाईन मुलाखतीचे काही टप्पे पार करत त्याने मुलाखतीचा शेवटचा टप्पा गाठला. गुगलच्या लंडन येथील कार्यालयात त्याची अंतिम मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये अब्दुल्ला उत्तीर्ण झाल्यामुळे गुगलने त्याला वार्षिक 1.2 कोटी रुपये वेतन दिले.