कोलकाता : फेब्रुवारी २०१२ मधील पार्क स्ट्रीट सामूहिक बलात्काराचे आरोपी नासिर खान, रुमन खान व सुमित बजाज हे कारागृहात आहेत; परंतु तरीही ते कारागृहातील आपल्या सेलमध्ये फेसबुकवर सक्रिय आहेत व नियमितपणे अपडेटस् टाकत आहेत.हे तिन्ही आरोपी मोबाईलवरून नेहमीच चॅट करीत असतात व छायाचित्रांवर प्रतिक्रिया नोंदवीत असतात. एवढेच नव्हे, तर ते सोशल मीडियावर फार जास्त सक्रिय आहेत; परंतु कारागृह प्रशासनाने मात्र त्यांच्या या कारवायांकडे पूर्णपणे डोळेझाक केलेली असल्याचे उघड झाले आहे.न्यायालयीन कोठडीत राहून फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर अपडेट टाकण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. याआधी २०१४ मध्ये कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला होता आणि त्यावेळी या तिन्ही आरोपींजवळून मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर या तिघांनाही शिक्षा म्हणून दुसऱ्या कारागृहात हलविण्यात आले; परंतु ही शिक्षा त्यांच्यासाठी वरदान ठरली आणि तेथेही त्यांनी मोबाईल फोन मिळविला.रुमन खान याने १९ मार्च रोजी दोन वेळा आपल्या फेसबुक कव्हरवरील चित्र अपडेट केले आणि हे चित्र अपडेट केल्यानंतर त्याला अवघ्या काही तासांच्या आतच १८ लाईक्स मिळाले, असे तपासात उघड झाले आहे. नासिर हा देखील आपले प्रोफाईल पिक्चर अपडेट करीत होता आणि त्याने डिसेंबर २०१४ मध्ये कव्हर चित्र अपडेट केले होते. सुमितने तर २६ जानेवारी २०१५ रोजी आपल्या फेसबुकवरून मित्रांना ‘गणराज्य दिन चिरायू होवो’ असा संदेश पाठविला होता. सुमितच्या फेसबुकमधील पानावर तो कारागृहातील सेलच्या गजाजवळ बसलेला असल्याचा फोटोही टाकण्यात आला आहे. त्याचा हा फोटो २०१३ चा आहे.तिघांत रुमन खान हा फेसबुकवर सर्वांत जास्त सक्रिय आहे असे दिसते. फेसबुकवर त्याने आपले अंगप्रदर्शन करणारे अनेक फोटो टाकले आहेत. कदाचित हे सर्व फोटो कारागृहातच काढलेले असावेत. (वृत्तसंस्था)
गँगरेपचे आरोपी टाकतात फेसबुक पोस्ट
By admin | Published: April 01, 2015 1:26 AM