नवी दिल्ली - ऐन लोकसभा निवडणुकीच्या मोसमात फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेल्या अकाऊंट्स आणि पेजेसवर मोठी कारवाई केली आहे. आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसेच निलंबित करण्यात आलेली सुमारे 687 फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटवली आहेत.
''आमच्या स्वयंचलिक प्रणालीने आधीच हेरलेल्या आणि निलंबित केलेल्या सुमारे 687 फेसबूक अकाऊंट्स आणि पेजेसवर आम्ही कारवाई करताना ही पेजेस आणि अकाऊंट्स हटवली आहेत. या पेजेसवर प्रकाशित माहितीमुळे नव्हे तर अप्रामाणिक माहितीमुळे कारवाई करण्यात आली आहे. ही पेजेस आणि अकाऊंट्स वैयक्तिकरीत्या काँग्रेसच्या आयटी सेलशी निगडित होती,'' असे फेसबुकने या कारवाईूबाबत माहिती देताना म्हटले आहे.
डिलीट करण्यात आलेल्या या पेजचे अॅडमिन आणि अकाऊंटसचे ओनर स्थानिक बातम्या, आगामी निवडणुकीसंदर्भातील राजकीय मुद्दे, उमेदवारांची भूमिका मांडत असत. तसेच भाजपासह काँग्रेसच्या इतर विरोधकांवर या पेजेस आणि अकाऊंट्सवरून टीका करण्यात येत असे. तसेच ही पेजेस आणि अकाऊंट्स काँग्रेसच्या आयटी सेलशी वैयक्तिकरीत्या जोडली गेली होती.
फेसबूकच्या सायबर सिक्यॉरिटीचे पॉलिसीचे प्रमुख नाथनेल ग्लेचियर यांनी सांगितले की, कारवाई करण्यात आलेल्या अकाऊंट्शी संबंधित व्यक्तींनी आपली ओळख लपवून काम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आम्ही केलेल्या तपासामध्ये ही मंडळी काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असल्याचे उघड झाले होते. त्यांना अकाऊंटच्या वॉलवर असलेल्या माहितीमुळे नाही तर ओळख लपवून केलेल्या अप्रामाणिकपणामुळे हटवण्यात आले आहे.