लोकमत ऑनलाइन
अहमदाबाद, दि. 1- फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्यात तासनतास घालवले जातात अशी ओरड नेहमीच ऐकु येत असते. पण चॅटिंग किंवा फोटो शेअरिंगच्या पलिकडे जाऊन इतरही गोष्टी सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर केल्या जातात. सोशल नेटवर्किंग साइट्स सध्या व्यवसायाचं माध्यम म्हणून लोकांच्या फायद्याचं ठरतं आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून आज गृहिणी चांगली कमाई करत आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे झारखंडमधील बोकारो शहरातील पूजा सिंह ही गृहिणी.
दहा वर्षापेक्षा जास्त काळ हैदराबादमध्ये राहिलेली पूजा लग्नानंतर झारखंडमधील बोकारो शहरात स्थायिक झाली होती. लग्नापूर्वी पूजा हैदराबादमध्ये तिचं कपड्यांचं दुकान चालवत होती. पण लग्नानंतर तिला दुकान बंद करावं लागलं. झारखंडमध्ये आल्यावर नवं दुकान सुरू करू असा निर्णय तीने घेतला होता पण तिथे गेल्यावर दुसरं दुकान सुरू करणं पूजाला शक्य झालं नाही. तरी पूजाने आपली व्यवसायाची आवड जोपासण्यासाठी ऑनलाइन मार्केटिंगचा आधार घेतला. व्हॉट्स अॅप हे चॅटिंग अॅपलिकेशन आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून पूजाने कपड्यांची विक्री करायला सुरुवात केली. हळूहळू पूजाचा कपड्यांचा व्यवसाय वाढतो आहे. दर महिन्याला ती ७०-८० ड्रेसे विकते आहे. झारखंडमध्येच ७० टक्के ग्राहक तीला मिळाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पूजाला व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून दुसऱ्या राज्यातील ग्राहकांच्याही ऑर्डर्स मिळू लागल्या आहेत. पूजाच्या या व्यवसायाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ती आता कपड्यांव्यतिरिक्त इतर उत्पादनंही ऑनलाइन पद्धतीने विकण्याचा विचार करत आहे.
पूजाप्रमाणेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जयपूरच्या निधी जैन या गृहिणीनेसुद्धा आपला रिटेल व्यवसाय सुरू केला आहे. "सुरुवातीला मी पुनर्विक्रीसाठी दुसऱ्या पुरवठादारांच्या छोट्या छोट्या ऑर्डर्स स्वीकारत होती. सोशल मीडियामुळे हळूहळू माझं नेटवर्क वाढल्याने आता चांगली विक्री होत आहे. असं निधीने सांगितलं आहे. निधी व्हॉट्स अॅपचा वापर पेमेंट्स आणि लॉजिस्टिक्ससाठी करते, तर मालाच्या विक्रीसाठी आणि ग्राहक वाढविण्यासाठी फेसबुकचाच चांगला उपयोग होतो, असं तिचं मत आहे.