नवी दिल्ली - दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. पण यंदा कोरोनामुळे लोकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच देशामध्ये अनेक मेसेज हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही मेसेज हे लोकांना सतर्क करतात तर काही मेसेज अफवा पसरवतात. दिवाळीत चिनी माल न वापरता स्वदेशी वापरा असाही संदेश दिला जातो. तसेच फटाके वाजवून प्रदूषण करू नका असं म्हटलं जातं अशातच सध्या एक मेसेज जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये भारतात अस्थमा आणि डोळ्यांचे आजार पसरवण्यासाठी चीनने खास फटाके बनवले असल्याचं म्हटलं जात आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबत लोकांना अलर्ट केलं आहे. गृह मंत्रालयाच्या नावे अशाप्रकारे बनावट मेसेज बनवून लोकांची फसवणूक केली जात आहे. असा मेसेज आल्यास तुम्ही फसू नका आणि चिंता करू नका. कारण सरकारकडून अशी कोणतीही सूचना जारी करण्यात आलेली नाही आहे. यंदा दिवाळीआधी तुम्हाला असा मेसेज आला तर त्यावर विश्वास ठेवू नका. पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजमधील दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. गृह मंत्रालयाने अशी कोणतीही सूचना न दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे घाबरू नका असं देखील सांगितलं आहे.
जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'
व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये "इंटेलिजन्सनुसार पाकिस्तान भारतावर थेट हल्ला करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी भारताचा बदला घेण्यासाठी चीनकडे मागणी केली आहे. चीनने भारतात अस्थमा पसरवण्याठी फटाके विशिष्ट प्रकारे बनवले आहेत. जे कार्बन मोनोऑक्साइड गॅससारखे विषारी आहेत. याशिवाय भारतात डोळ्यांचे आजार पसरवण्यासाठी विशेष प्रकारची सजावटी लाइटिंग देखील बनवण्यात येत आहे. यात मोठ्या संख्येने पाऱ्याचा वापर केला जात आहे. या दिवाळीत चिनी उत्पादनांचा वापर करू नका. हा मेसेज सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवा" असं म्हटलं आहे. WhatsApp मेसेजमध्ये ही सूचना गृहमंत्रालयाकडून आल्याचे या म्हटलं आहे. पण अशाप्रकारे कोणतीही सूचना दिली नसल्याचे केंद्र सरकारच्या पीआयबी संस्थेच्या फॅक्ट चेक टीमने स्पष्ट केलं आहे.
"लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?"; जाणून घ्या, 'सत्य'
कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल होत होते. PIB ने या काळात खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.