नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 48,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल तीन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत असून ज्यामध्ये देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्य़ा काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. मात्र काही ठिकाणी वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवरच सध्या पुन्हा एकदा देशभरात संपूर्ण लॉकडाऊनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचे अनेक मेसेजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका न्यूज चॅनलचा स्क्रीनशॉट आहे. यामध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे 1 जुलै ते 31 जुलै कडक लॉकडाऊन असंही यात लिहिण्यात आलं आहे.
प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau) लॉकडाऊनबाबत व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच असून केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे. त्यामुळेच 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू होत असल्याचं वृत्त खोटं असल्याचं आता समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
भीषण, भयंकर, भयावह! जगभरात Delta व्हेरिएंटचा हाहाकार; भारत, अमेरिका, ब्रिटनसह 100 देशांमध्ये प्रसार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोकादायक असलेला डेल्टा व्हेरिएंट हा सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये भारतात आढळून आला आहे. मात्र आता जवळपास 100 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. मूळ कोरोना व्हायरसपेक्षा हा व्हेरिएंट अडीचपटीने अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढू लागली आहे. 78 देशांच्या GISAID आकड्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की, भारत, रशिया, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासह इतर देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आपली पकड अधिक मजबूत करत आहे.