नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक नवनवीन गोष्टी या सातत्याने व्हायरल होत असतात. असाच एक मेसेज सध्या तुफान व्हायरल होत आहे. मोदी सरकार तरुण आणि बेरोजगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. कर्ज देण्यासाठी सरकारने मुद्रा कर्ज योजना आधीच सुरू केली आहे, ज्यामध्ये तरुणांना त्यांचा रोजगार सुरू करण्यासाठी कमी दरात कर्ज दिले जात आहे. पण आता व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत सरकारने लोकांना अलर्ट केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये केंद्र सरकार सर्व नागरिकांना त्यांच्या आधार कार्डवर 4.78 लाख रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा केला जात आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे ते या कर्जासाठी अर्ज करू शकतात. यापूर्वी एका व्हायरल मेसेजमध्ये असाही दावा केला जात होता की, बेरोजगार तरुणांना सरकार 6,000 रुपये भत्ता देत आहे आणि त्याची नोंदणीही सुरू झाली आहे.
पोस्टचे फॅक्ट चेकनंतर पीआयबीच्या वतीने ट्विट करून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हा दावा पूर्णपणे बोगस असून सरकारकडून असे कोणतेही कर्ज दिले जात नाही, असे पीआयबीने म्हटले आहे. PIB ने लोकांनी असे मेसेज शेअर करू नका असा सल्लाही दिला आहे. पीआयबीने म्हटले आहे की फसवणूक करणारे लोक अशा प्रकारची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करतात, जेणेकरून त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करणे सोपे होते.
बँकिंग तज्ज्ञ अश्विनी राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बँका आधारद्वारे वैयक्तिक कर्ज देतात. आधार हे तुमचे प्राथमिक ओळखपत्र मानले जाते आणि अशा कर्जासाठी कोणतेही तारण भरावे लागणार नाही. केवायसी केल्यानंतर, बँका पगार स्लिप किंवा इतर कागदपत्रांशिवाय आधारद्वारे एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देतात. मात्र कर्ज मिळणे पूर्णपणे तुमच्या चांगल्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर तुमचा CIBIL स्कोर 700 च्या वर असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.