नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,12,16,337 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,015 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,18,480 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात लोकांसाठी विविध योजना लाँच करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारच्या वतीने गरजुंना, गरिबांना मदत करण्यात येत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही लोकांना मदतीचा हात दिला आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये हातावरचं पोट असणाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याच दरम्यान सर्वसामान्यांना नोकरीचं आमिष दाखवत त्यांची मोठी फसवणूक केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोदी सरकारच्या नावाने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं जात आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून अर्जासाठी काही पैसे वसूल केले जात आहे. पीएम रोजगार योजनेची फेक वेबसाईट बनवून त्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे.
पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, https://pmrojgaaryojna.in या वेबसाईटच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत आणि 100 रुपये नोंदणी शुल्क मागितले जात आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो देखील वापरण्यात आला आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau) व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच असून केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे. नोकरीच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका. अधिकृत वेबसाईटव्यतिरिक्त इतर कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करणं टाळा. प्रेस इन्फोरमेशन ब्युरोने फॅक्ट चेक (PIB Fact Check) च्या माध्यमातून लोकांना सावध केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.