नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 2 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली असून मृतांचा आकडाही सातत्याने वाढत आहे. देशात लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू असून अनेकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक मेसेज हे जोरदार व्हायरल होत आहेत. सध्या व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) माध्यमातूनही कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करता येतं (Corona Vaccine) असा एक मेसेज फिरत आहेत. खरंच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करता येते का? हे जाणून घेऊया.
व्हॉट्सअॅपवर तुफान व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये कोरोना लस घेण्यासाठी व्हॉट्सअॅपद्वारे नोंदणी करता येते असं म्हटलं आहे. तसेच लसीसाठी नोंदणी करायची असल्यास 9745697456 या नंबरवर Hi असा मेसेज टाका. या नंबरवरून लोकांकडे सुरुवातीला आधार कार्डच्या डिटेल्स मागितले जातात. तसेच तुमच्या पिन कोड नंबरच्या मदतीने रुग्णालय शोधायचं आहे असं सांगितले जातं. त्यामुळे लोक सहजपणे या मेसेजवर विश्वास ठेवतात. पण हा मेसेज खोटा असल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau) हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार को-विन आणि आरोग्य सेतू या दोन पर्यायांशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकत नाही. व्हॉट्सअॅपवर फिरणारा मेसेजमधील दावा खोटा असून त्यावर विश्वास ठेवू नका असं सांगण्यात येत आहे. पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. कोरोना लसीकरणाची नोंदणी फक्त को-विन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपद्वारेच करता येईल. कोणीही व्हॉट्सअॅपवरून तुम्हाला लसीकरणाच्या नोंदणीबद्दल सांगत असेल तर अशा लोकांपासून सावध राहा. ते तुम्हाला फसवू शकतात असा सल्लादेखील पीआयबीने दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाने सर्वच रेकॉर्ड मोडले! गेल्या 24 तासांत 2 लाख रुग्ण सापडले; चिंता वाढवणारी आकडेवारी
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल एक कोटीच्यावर गेला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (15 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,00,739 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,038 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,40,74,564 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 73 हजारांवर पोहोचला आहे.