नवी दिल्ली - कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,47,88,109 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 77 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 18,01,316 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,28,09,643 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान रुग्णालयात रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह (V. K. Singh) यांनी आपल्या भावाला बेड मिळत नाही. त्यांना बेड मिळण्यासाठी मदत करावी असं आवाहन आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं होतं. तसेच व्ही. के. सिंह यांनी गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना टॅग केलं होतं. "आमची मदत करा, माझ्या भावाला कोरोना संसर्ग झालेला असून त्याच्या उपचारासाठी बेडची आवश्यकता आहे. गाझियाबादमध्ये बेडची व्यवस्था होत नाही. कृपया तुम्ही लक्ष घाला असं आवाहन व्ही. के. सिंह यांनी केलं होतं" असं ट्विटमध्ये म्हटलं होतं. मोदींच्या मंत्र्याच्या भावालाच बेड मिळत नसल्याने हे ट्विट वेगाने व्हायरल झालं. मात्र त्यानंतर आता सिंह यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
आपण ट्विटमध्ये भाऊ म्हणून उल्लेख केलेली व्यक्ती ही खऱ्या आयुष्यात आपली नातेवाईक नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच हिंदीमध्ये असलेलं हे एक फॉरवर्डेड ट्विट असल्याचं म्हटलं आहे. रुग्णाला लवकर मदत मिळावी या दृष्टीने आपण ते फॉरवर्ड ट्विट आपल्या अकाऊंटवरून ट्विट केल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यानंतर यावर स्पष्टीकरण देणारं आणखी एक ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामध्ये तो माझा रक्ताने भाऊ नाही. पण आमच्यात माणुसकीचं नातं आहे. रुग्णापर्यंत लवकर मदत पोहोचावी म्हणून ते ट्विट केलं असल्याचं व्ही. के. सिंह यांनी आता म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मध्य प्रदेशच्या शहडोलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर झाल्याचा दावा शिवराज सिंह चौहान सरकार करत आहे. पण या घटनेने सरकारचा दावा फोल ठरला आहे. शहडोलच्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रुग्ण तडफडत होते पण प्रयत्न करूनही डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत. 12 जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गेल्या 24 तासांत ऑक्सिजन अभावी 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. आयसीयूमध्येही अनेक रुग्ण आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा असता तर आणखी मृत्यू झाले असते. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण उपलब्ध ऑक्सिजनच्या माध्यमातून रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन दिला जात आहे असा दावा रुग्णालयाने केला आहे.ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता तर ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाले होतं असं म्हटलं आहे.