वायनाडः केरळमधल्या वायनाडमधूनराहुल गांधींनी लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली. अनेक युजर्सनी फेसबुक आणि ट्विटवर व्हिडीओ पोस्ट केले, ज्यात काही कार्यकर्ते हिरवे झेंडे घेऊन घोषणाबाजी करताना दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमधील हिरवे झेंडे हे पाकिस्तानी असल्याचीही चर्चा आहे, तसेच ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ फडकावण्यात आल्याचीही आवई उठवली गेली. परंतु या सर्व गोष्टींची पडताळणी केली असता, हे सर्व खोटं असल्याचं समोर आलं आहे.
इंडियन युनियन मुस्लिम लीग(IUML) हा केरळमधला काँग्रेसचा मित्र पक्ष आहे. 26 मार्चला फेसबुकवर 'चौकीदार बी के मिश्रा' या नावाच्या युजर्सनं एक व्हिडीओ पोस्ट केला, 25 सेकंदांच्या या व्हिडीओला ‘न्यूज 18 मलयालम’चा लोगो लावण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ काही लोक घोषणाबाजी करत असल्याचंही समोर दिसत होतं. या व्हिडीओमध्ये काही लोकांकडून फडकावण्यात आलेल्या झेंड्यांमध्ये पांढरे स्टार आणि एक अर्धा चंद्र दिसत होता. या व्हिडीओबरोबर लिहिलं होतं की, राहुल गांधींचा वायनाड (केरळ)मध्ये पाकिस्तानी झेंड्यांसह प्रचार.