नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागी पूर्वी एक भव्य मंदिर होते व त्या मंदिराच्या जागीच नंतर मशीद बांधली गेली आणि मशीद बांधली गेल्यावरही श्री रामाची जन्मभूमी म्हणून त्या जागेवरील हिंदूंची श्रद्धा व तेथील त्यांची वहिवाट कायम राहिली, हे साक्षीपुराव्यांनी सिद्ध झालेले सत्य आहे, असा युक्तिवाद त्या ठिकाणच्या रामलल्ला या देवतेच्या वतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.अॅड. वैद्यनाथन यांनी उच्च न्यायालयापुढे झालेल्या साक्षी-पुराव्यांचे सविस्तर दाखले देत प्रामुख्याने तीन गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे, अयोध्येची ही जागा प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान म्हणून हिंदूंचे पूर्वापारचे श्रद्धास्थान आहे. दुसरे असे की, नंतरच्याकाळात जेथे बाबरी मशिद बांधली गेली तेथे पूर्वी एक मंदिर होते.आणि तिसरे मशिद उभी राहिली तरी त्या स्थानावरील हिंदूंची श्रद्धा व तेथील त्यांचा राबता अबाधित राहिला. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांतील साक्षीदारांच्या साक्षींवरून हेच सिद्ध होते, असे ते म्हणाले.
‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 4:15 AM