नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी रात्री भेट झाली. या भेटीत राज्यातील आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. त्यामध्ये विशेषत: शिवसेना अन् भाजपा युतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे शिवसेनेसोबत लवकर जागावाटप पूर्ण करावे, अशा सूचना अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भेटीत सर्वप्रथम माजी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर, भाजपाध्यक्ष आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निरीक्षक अमित शहा यांच्यासमवेत तब्बल 40 मिनिटे चर्चा केली. या भेटीदरम्यान, शिवसेनेसोबत लवकरच युतीबाबतची बोलणी पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी फडणवीस यांना केल्याची सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान, सध्या भाजप आणि शिवसेना या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून जोरदार इनकमिंग सुरू आहे. या इनकमिंगचा विचार करतानाच दोन्ही पक्षांची युती होणार असा दावा वरिष्ठ पातळीवर करण्यात येत असतानाच मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र महाजनादेश यात्रा काढली. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून स्वतंत्र तयारी केली आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जोरात असतानाच जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार यावर कोणीही भाष्य करीत नाही. शिवसेना छोटा भाऊ होण्यास तयार नाही आणि भाजप मोठा भाऊ झाल्याचे सांगायला विसरत नाही. त्यामुळेच सेना-भाजपा युती होणार की नाही ? हा प्रश्न नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीत या प्रश्नावर उत्तर मिळाल्याचं समजतंय.