लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे प्रभारी म्हणून भाजप नेतृत्वाने निवड केली आहे. गोव्यामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत भाजपला विजय मिळवून देण्यासाठीची जबाबदारी फडणवीस यांना सोपविण्यात आली आहे. याआधी बिहार विधानसभा निवडणुकांत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे प्रभारी म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती.
बिहारमध्ये फडणवीस यांनी केलेल्या व्यूहरचनेनुसार भाजपने २०२० साली त्या राज्यातील निवडणुका लढविल्या होत्या. त्यामध्ये भाजपने ७० हून अधिक जागा जिंकून संयुक्त जनता दलासह पुन्हा त्या राज्यात सत्ता काबीज केली होती. मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री असताना तिथे भाजपची निरंकुश सत्ता होती. मात्र पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपला गोव्यातील सत्ता टिकविताना बऱ्याच कसरती कराव्या लागल्या. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १३ जागा मिळाल्या. त्यांच्या आठ जागा कमी झाल्या. भाजपने घटक पक्षांना सोबत घेऊन गोव्यात सरकार स्थापन केले होते. गोव्यामध्ये विधानसभेच्या ४० जागा असून, २१ आमदारांचा पाठिंबा असलेला पक्ष तिथे सरकार स्थापन करू शकतो.
धर्मेंद्र प्रधान उत्तर प्रदेशचे भाजप प्रभारीपुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांच्या भाजप प्रभारींच्या नावाची त्या पक्षाने घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश या अतिशय महत्त्वाच्या राज्याच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, पंजाबच्या प्रभारीपदी गजेंद्रसिंह शेखावत, उत्तराखंडची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे तर मणिपूरच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्री भूषण यादव यांची निवड भाजप नेतृत्वाने केली आहे. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी आठ केंद्रीय मंत्र्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.