बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका मुस्लिम तरुणीने प्रेम मिळवण्यासाठी धर्म बदलला आहे. तिने फक्त धर्मच बदलला नाही, तर नावही बदललं. फहरीना खातून आता खुशबू झाली असून तिने करण नावाच्या मुलाशी लग्न केलं आहे. प्रेम शोधण्यासाठी तिने घरातून पळ काढला आणि हिंदू धर्म स्वीकारला असं सांगितले जात आहे. त्यानंतर हिंदू रितीरिवाजांनुसार मंदिरात त्यांचे लग्न झाले. त्याच्या धर्मांतरामुळे नातेवाईक संतप्त झाले असून तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं सांगण्यात येत आहे.
फहरीना खातून मुझफ्फरपूरच्या करजा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या पाकडी पकोही गावातील रहिवासी आहे. तिचे गावातील एका हिंदू मुलावर प्रेम होते. या दोघांमध्ये सुमारे दीड वर्षे संबंध होतं. जेव्हा प्रेम वाढलं तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. असं सांगितलं जात आहे की दोघांचे कुटुंबीय या नात्यासाठी तयार नव्हते. यानंतर फहरीनाने कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध हिंदू धर्म स्वीकारला आणि नंतर मंदिरात रितीरिवाजांनुसार लग्न केले.
फहरीनाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर फहरीना उर्फ खुशबू तिच्या पतीसोबत पुढे आली आणि सर्वप्रथम पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांचा न्यायालयात जबाब नोंदवला. कोर्टात फहरीनाने सांगितलं की, तिचं अपहरण झालं नव्हतं तर ती स्वतः घरातून पळून गेली होती आणि करणसोबत होती. फहरीना म्हणाली की, तिने हिंदू धर्म स्वीकारला आणि एका मंदिरात करणशी लग्न केलं. तिला करणसोबत राहायचं आहे आणि तिला तिच्या सासरी जायचं आहे.
जीवे मारण्याच्या धमक्या
फहरीनावर विश्वास ठेवला तर तिला तिच्या कुटुंबीयांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तिच्याविरोधात फतवा काढण्यात आला आहे. फहरीनाने सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागितली आहे. मुझफ्फरपूर न्यायालयात कलम 164 अन्वये फहरीनाचा जबाब नोंदवून तिला पतीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोघेही वयाने मोठे आहेत आणि एकत्र राहू शकतात. पोलिस दोघांनाही सुरक्षा पुरवणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.