नवी दिल्ली - कोरोना काळात विविध राज्यांच्या सरकारने करोनाशी लढण्यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनेही कोविड योद्धा म्हणून अशा अनेक नागरिकांची मदत घेऊन कोरोनाच्या लढाईत लढा दिला आहे. कोरोनाच्या लढाईत अनेक नेत्यांनीही पुढाकार घेऊन गरिब व गरजूंना मदत केली. त्यादरम्यान, अनेकांना कोरोनाची लागणही झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील अशाच एका कोरोना योद्ध्याची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. कोरोनामुळे या कोविड योद्ध्याचा 13 जुलै रोजी मृत्यू झाला.
दिल्लीतील अरुण सिंग यांनी तीन महिन्यांहून जास्त काळ करोनाग्रस्त तसेच अडकलेल्या मजूरवर्गाला अन्नधान्य व जेवण पुरवण्याचं काम केलंय. मात्र, अरूण सिंग यांचे सोमवारी (१३ जुलै) निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. महिन्याच्या सुरूवातीला अरूण सिंग यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ४ जुलैला त्यांना द्वारका विभागातील वेंकटश्वर रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण, सोमवारी रात्री साडेनऊच्या आसपास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल यांनीही अरुण सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, त्यांच्या निधनाची बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत, अरुणसिंग यांनी बलिदान दिल्याचं म्हटंलय. गेल्या तीन महिन्यांपासून लोकांना अन्नधान्य पुरविण्याचं काम त्यांनी केल्याचे सांगत, अरुणसिंग यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचंही केजरीवाल यांनी म्हटलं.