पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका वडिलांना आपल्या 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन बसने 200 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. या घटनेनंतर राजकारण तापलं आहे. भाजपाने ममता बॅनर्जी सरकारच्या 'स्वास्थ्य साथी' योजनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच तृणमूल काँग्रेसने हे वाईट राजकारण असल्याचं म्हटलं आहे.
मुलाचे वडील आशिम देबशर्मा यांनी रविवारी सांगितले की, त्यांच्या 5 महिन्यांच्या मुलाचा शनिवारी रात्री सिलीगुडी येथील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसांपासून या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारासाठी 16 हजार रुपये खर्च झाले. रविवारी आशिम यांनी रुग्णवाहिका चालकाला मुलाचा मृतदेह कालियागंज येथील त्याच्या घरी नेण्याची विनंती केली असता चालकाने त्याच्याकडे 8 हजार रुपयांची मागणी केली.
आशिम यांनी दावा केला की 102 योजनेअंतर्गत चालणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाने त्यांना सांगितले की रुग्णांसाठी ही सुविधा मोफत आहे, परंतु मृतदेह नेण्याबाबत कोणताही नियम नाही. आशिम देबशर्मा यांच्याकडे रुग्णवाहिका चालकाला देण्यासाठी 8,000 रुपये नव्हते, म्हणून त्यांनी 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सार्वजनिक बसमधून कालियागंजला नेण्याचा निर्णय घेतला.
देबशर्मा यांनी मुलाचा मृतदेह एका पिशवीत ठेवला आणि दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी ते 200 किमी अंतरावर असलेल्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंजपर्यंत बसने प्रवास केला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनाही त्यांनी य़ाचा सुगावा लागू दिला नाही. इतर प्रवाशांना हा प्रकार कळला तर ते त्याला बसमधून उतरवतील, अशी भीती आशिमला होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.