भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोबाबत देशवासीयांच्या मनात आदराची भावना राहिली आहे. अनेक यशस्वी मोहिमांमुळे इस्रोचे प्रमुखपद भूषवणाऱ्यांना देशात मानाचं स्थान असतं. मात्र आज इस्रोबाबत काहीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी दक्षिण भारतामधील प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी इस्रोचे माजी प्रमुख के. सिवान यांच्यावर आरोप केल्याचा दावा करण्यात आला आहे. सिवान यांनी सोमनाथ यांच्या इस्रोप्रमुख बनण्यामध्ये अडथळा आणला होता, असा दावा करण्यात आला आहे. सोमनाथ इस्रोप्रमुख बनू नयेत, अशी सिवान यांची इच्छा होती, असा दावा सोमनाथ यांनी त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या निलावू कुडिचा सिम्हंल या पुस्तकामधून केला आहे.
ज्यावेळी याबाबत सोमनाथ यांच्याशी पीटीआयने संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला कुठल्या संस्थेमध्ये सर्वोच्च पदावर जाण्यादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक आव्हानं पार करावी लागतात. तशाच समस्या आव्हानं माझ्यासमोर आली. मी माझ्या जीवनाच आलेल्या आव्हानांबाबत लिहिलं आहे. मी कुणावरही वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही. तसेच मी जे बोललोय, ते कुठल्याही एका व्यक्तीबाबत बोललेलो नाही.
कुठल्याही मोठ्या पदासाठी अनेकजण उपयुक्त असतात. मी केवळ हाच मुद्दा उपस्थित केला होता. मी कुठल्याही एका व्यक्तीवर टीका केलेली नाही. दरम्यान, सोमनाथ यांनी चंद्रयान-२ अपयशी होण्यामागचं महत्त्वाचं कारणंही सांगितलं आहे. सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-२ हे तेव्हा झालेल्या घाईगडबडीमुळे अपयशी ठरले. कारण त्याबाबत जेवढ्या व्हायला पाहिजे होत्या तेवढ्या चाचण्या झाल्या नाहीत.
सोमनाथ म्हणाले की, माझ्या पुस्तकामध्ये चंद्रयान-२ अपयशी होण्यामागची खरी कारणं माझ्या पुस्तकामध्ये नमूद केली आहेत. या पुस्तकात ते लिहितात की, चंद्रयान अपयशी ठरल्याची घोषणा करताना ज्या चुका झाल्या, त्या लपवण्यात आल्या होत्या. सोमनाथ यांच्या मते जे जसं घडतंय, ते त्याच प्रकारे सांगितलं गेलं पाहिजे. सत्य सर्वांसमोर आलं पाहिजे. त्यामुळे इस्रोची पारदर्शकता समोर येते. त्यामुळेच पुस्तकामध्ये चंद्रयान-२ च्या अपयशाचा उल्लेख करण्यात आला आहे. सोमनाथ यांतं हे पुस्तक लवकरच बाजारात येणार आहे.