पाटणा - बिहारमधील गोपालगंज आणि मोकामा विधानसभा मतदारसंघामध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वीच महाआघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या जागांवर आता मुख्यमंत्री नितीश कुमार हे आरजेडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत.
नितीश कुमार यांनी पोटाला आणि पायाला झालेल्या दुखापतीचंकारण देत सांगितलं की, त्यांची प्रकृती अद्यापही सुधारलेली नाही. त्यामुळे ते मोकामा आणि गोपालगंज येथे आरजेडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाऊ शक0णार नाहीत. मात्रा या दोन्ही ठिकाणी जेडीयूचे वरिष्ठ नेते दोन्ही जागांवर आरजेडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्यासाठी जातील.
बिहारमध्ये महाआघाडी सरकार आल्यापासून नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे महाआघाडीमध्ये सारं काही आलबेल असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेडीयू आणि आरजेडीमधील मतभेद उफाळून आले आहेत.
मोकामा येथील आरजेडी आमदार अनंत सिंह यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तर गोपालगंज येथील भाजपा आमदार सुभाष सिंह यांचं निधान झाल्याने येथील जागा रिक्त झाली आहे. मोकामाची जागा आरजेडीकडे तर गोपालगंजची जागा भाजपाकडे होती. त्यामुळे आता नितीश कुमार यांनी भाजपाशी असलेली मैत्री तोडून महाआघाडीसोबत घरोबा केल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.