मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षीत पद्मावती चित्रपटाला मोठ्याप्रमाणात विरोध होताना दिसत आहे. राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये चित्रपटाविरोधात सर्वात जास्त रोष पहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये या चित्रपटाला जास्त विरोध होत आहे. येथील चित्तौडगडमध्ये विरोध प्रदर्शन करणा-या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. दरम्यान, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. चित्तौडगडवरील मुख्य दरवाज्या बंद करण्याचा प्रयत्न यावेळी आंदोलकांनी केला. त्यानंतर पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. याचबरोबर, पद्मावती या चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी अनेक संघटना याठिकाणी शस्त्रास्त्र घेऊन आल्याचे समजते.
पद्मावतीला कोणीही रोखू शकणार नाही - दीपिका पदुकोणचित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत, असे अभिनेत्री दीपिका पदुकोणने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते. तसेच, हा चित्रपट ठरल्यानुसार 1 डिसेंबरला प्रदर्शित होईल, असा विश्वास सुद्धा तिने व्यक्त केला होता.
पद्मावतीला विविध संघटनांचा विरोध... पद्मावती या चित्रपटला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. जयपूरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्साळींना मारहाणही करण्यात आली होती. महाराणी पद्मावतीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तसेच या चित्रपटातून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.