मुंबई : उत्पादनांच्या किमती कमी झाल्याने घाऊक किमतीवर आधारित महागाई ऑगस्टमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात १२.४१ टक्क्यांवर घसरली आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्या असल्या तरी महागाईचा आकडा खाली आला आहे. सलग १७ महिन्यांपासून देशात महागाई दोन आकड्यांमध्ये असून, ग्राहकांना चटके बसत आहेत.
जुलैमध्ये महागाई दर १३.९३ टक्के, तर जूनमध्ये १५.१८ टक्क्यांवर पोहोचला होता. जुलैमध्ये घाऊक महागाई १० महिन्यांच्या नीचांकावर आली आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये महागाई दर १३ टक्क्यांवरून १०.६६ टक्क्यांवर आला होता. बटाटे काही प्रमाणात स्वस्त झाले आहेत, तर कांदे २४.७६ टक्के महाग झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानेही महागाईत वाढ झाल्याचे दिसत आहे.
काय स्वस्त काय महाग?ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थांची महागाई वाढून १२.३७ टक्क्यांवर पोहोचली. जुलै महिन्यात ती १०.७७ टक्के होती. जुलैमध्ये भाज्यांचे भाव वाढून २२.२९ टक्क्यांवर आले आहेत. जे मागील महिन्यात १८.२५ टक्क्यांवर होते. ऑगस्टमध्ये इंधन आणि विजेची महागाई ३३.६७ टक्के राहिली, जी मागील महिन्यात ४३.७५ टक्के होती. उत्पादने आणि तेलबियांची महागाई अनुक्रमे ७.५१ टक्के आणि नकारात्मक १३.४८ टक्के राहिली. किरकोळ महागाई सलग आठव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त राहिली. ऑगस्टमध्ये ती७ टक्के होती.
आरबीआयने काय केले? महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने या वर्षी व्याजदर तीन वेळा वाढवून ५.४० टक्क्यांवर नेले आहेत. असे असतानाही महागाई ६ टक्क्यांच्या वरच आहे. केंद्रीय बँकेने २०२२-२३ मध्ये किरकोळ महागाईचा दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
नागरिकांवर काय परिणाम? घाऊक महागाईत दीर्घकाळ होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. याचा सर्वाधिक परिणाम उत्पादक क्षेत्रावर होतो. जर घाऊक किंमत जास्त राहिली तर उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतात. सरकार केवळ करांच्या माध्यमातूनच महागाई नियंत्रित करू शकते.
महागाई वाढल्याने अमेरिकेचा बाजार कोसळलाजागतिक आर्थिक मंदीच्या अहवालांदरम्यान अमेरिकेत ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारी जाहीर करण्यात आली. आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये महागाई दर जुलैच्या ५.९ टक्केवरून वाढ होत ६.३ टक्के नोंदवला गेला. त्यामुळे अमेरिकन बाजारात डाऊ जोन्स, नॅस्डॅक आणि एस ॲण्ड पीमध्ये मोठी घसरण झाली. डाऊ जोन्स १२७६ अंकांनी, एस ॲण्ड पीमध्ये ४.३२ टक्के तर नॅस्डॅक ६३२ अंकांनी घसरला.
कर्जदारांच्या ईएमआयमध्ये पुन्हा वाढ? ऑगस्टमध्ये महागाईचा दर उच्चांकी राहिला असून, सप्टेंबरमध्येही महागाईचा दर अधिक राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या महिन्यात रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ करू शकते, असे विश्लेषकांचे मत आहे. ३० सप्टेंबरच्या धोरण आढावा बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.