प्रयागराज - उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री बिहारचे राज्यपाल लालजी टंडन वास्तव्यास असलेल्या कॅम्पमध्ये आग लागली. सुदैवाने लालजी टंडन थोडक्यात बचावले. मात्र त्यांचे वास्तव्य असलेला टेंट तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या. या प्रकारानंतर राज्यपाल लालजी टंडन यांना कुंभ मेळ्यातील सर्किट हाऊसमध्ये हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी बिहारचे राज्यपाल लालजी टंडन हे प्रयागराज येथे आलेले आहेत. दरम्यान, कुंभमेळ्यात त्यांचे वास्तव असलेल्या टेंटला मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. आगीची घटना घडली तेव्हा राज्यपाल महोदय झोपलेले होते. त्यांना सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांच्याजवळील मोबाइल, चष्मा, घड्याळ आदी चीज वस्तू या आगीत जळून खाक झाल्या. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये याआधीही आगीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नाथ संप्रदायाच्या शिबीर क्षेत्रात आग लागली होती. त्यात दोन टेंट जळाले होते. त्याआधी 15 जानेवारी रोजी दिगंबर आखाड्याच्या टेंटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. त्यात 10 टेंट जळाले होते. त्याशिवाय कुंभमेळ्यामध्ये किरकोळ आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकारांमुळे कुंभमेळ्यातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
कुंभमेळ्यामध्ये पुन्हा अग्नितांडव; बिहारचे राज्यपाल थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 9:57 AM
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत.
ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत मंगळवारी रात्री बिहारचे राज्यपाल लालजी टंडन वास्तव्यास असलेल्या कॅम्पमध्ये आग लागली. सुदैवाने लालजी टंडन बालंबाल बचावले काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नाथ संप्रदायाच्या शिबीर क्षेत्रात आग लागली होती