संजय शर्मा/सुनील चावके लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोदी सरकार विरोधातील अविश्वास ठरावावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. केंद्रातील सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची, देशाची, हिंदुस्थानची हत्या केली, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत राजकारण करणे ही अतिशय दुर्दैवी व लाजिरवाणी गोष्ट आहे. मणिपूर हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांतपणे झोपले नाहीत, तसेच त्यांना झोपू देण्यात आले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा गुरुवारी तिसरा दिवस आहे. त्या दिवशी अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. त्यातून मोदी सरकारवरील विश्वास किंवा अविश्वासाचा फैसला होणार आहे. मोदी सरकारकडे संपूर्ण बहुमत असल्याने हा प्रस्ताव फेटाळला जाण्याचीच शक्यता अधिक आहे.