BJP Mayor Fakes Blood Donation : १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात साजरा करण्यात आला. हा दिवस खास बनवण्यासाठी भाजप नेत्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं. मात्र या नादात उत्तर प्रदेशात असं काही घडलं की ज्यावरुन भाजपला आता ट्रोल केलं जात आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादचे महापौर आणि भाजप नेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसालाही भाजपकडून लोकांची फसवणूक केली असल्याची टीका केली जात आहे.
मुरादाबादचे भाजपचे महापौर विनोद अग्रवाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपचे महापौर विनोद अग्रवाल हे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्यासाठी आले होते. मात्र ते रक्तदान न करताच फोटो काढून परतले. आता त्याच्या बनावट रक्तदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भाजपला ट्रोल केलं जात आहे.
भाजपने आयोजित केलेल्या शिबिरात महापौर विनोद अग्रवाल हे रक्तदान करण्यासाठी बेडवर झोपल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात भाजप कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. मात्र अग्रवाल यांनी रक्तदान न करताच तिथून काढता पाय घेतला. डॉक्टरांनी रक्त काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नकार दिला आणि तिथून निघून गेले. त्यावेळी कोणीतरी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जो आता व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये महापौर अग्रवाल रक्तदान शिबिरात बेडवर पडलेले दिसत आहेत. त्यावेळी एक आरोग्य कर्मचारी त्याचा रक्तदाब तपासण्याची तयारी करत होता. मात्र, त्यानंतर अग्रवाल यांनी डॉक्टरला पुढे काही करु नका असं सांगितले. रक्त गोळा करण्यासाठी सुई बाहेर काढताच महापौर अग्रवाल अचानक बेडवरून उठतात आणि खोलीतून निघून जातात. आम्ही फक्त फोटो काढायला आलो होतो, असं अग्रवाल म्हणाले. त्यानंतर महापौर विनोद अग्रवाल यांनी फोटो क्लिक करून रक्त न देता तेथून नेले.
व्हिडिओ व्हायरल होताच, विनोद अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली. हे प्रतिस्पर्ध्यांनी आपली बदनामी करण्यासाठी षड्यंत्र रचलं आहे. मी रक्तदान करण्यासाठी शिबिरात गेलो होतो. पण डॉक्टरांना त्यांना मधुमेह असल्याचे सांगितल्यावर ते रक्तदान करू शकत नसल्याचे सांगितले. "१७ सप्टेंबर रोजी भाजपच्या युवा शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. मीही रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे रक्त घेण्यापूर्वी डॉक्टरांनी मला काही आजार आहे का, असे विचारले. मी त्यांना सांगितले की मला मधुमेह आणि दोन वर्षांपूर्वी हृदयाचा त्रास झाला होता. तेव्हा मी रक्तदान करू शकलो नाही, असे अग्रवाल यांनी सांगितले.