नवी दिल्लीः एनआयए आणि गुरुग्राम पोलिसांनी संयुक्त केलेल्या छापेमारीत बनावट नोटा बनवणाऱ्या एक मास्टरमाइंडला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात कासिम हा यू ट्युबवरचे व्हिडीओ पाहून बनावट नोटा तयार करत असल्याचं समोर आलं आहे. जवळपास पाच महिन्यांपूर्वी त्यानं यू ट्युबवर अशा प्रकारचे व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली आणि हा गोरखधंदा सुरू केला. त्यानं आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मुलाला हाताशी घेतले. त्यानंतर कासिम अन् मुख्याध्यापकांचा मुलगा वसिम यांनी मिळून 1.20 कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या बनावट नोटा छापल्या. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.पुन्हाना गावातील सिंगर निवासी कासिम फजर(44) आठवी पास आहेत. कासिमला वसिमच्या वडिलांनीच आठवीपर्यंत शिकवलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कासिम अशिक्षित असूनही कॉम्प्युटर ऑपरेट करू शकतो. अशाच प्रकारे त्यानं यू ट्युबवर नकली नोटा कशा पद्धतीनं छापल्या जाऊ शकतात, याचा अभ्यास केला. व्हिडीओ पाहून पाहून त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यानं बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा सुरू केला. प्रिंटरच्या साहाय्यानं तो बनावट नोटा छापत होता. त्यानं या बनावट नोटा अनेक ठिकाणी खपवल्या आहेत. पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेतलं असून, त्याचा नेटवर्कचा थांगपत्ता लावला जात आहे.दुसरीकडे पोलिसांनी 29 मे रोजी सोहना रोडवर एनआयए आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 1.20 कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. तसेच दोन आरोपींना अटकही केली होती. आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस तपासात हे सर्व उघड झालं आहे. ते आरोपी या बनावट नोटा मेवातमधल्या घरातच छापत होते. नेपाळमार्गे पाकिस्तानतून त्यांना पेपर आणि शाही मिळत असल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा पोलीस तपास करत आहेत.
धक्कादायक! यू ट्युब पाहून आठवी पास बनवत होता दोन हजारांच्या बनावट नोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 4:06 PM