नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 वरून एका बनावट पायलटला अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जर्मन विमान कंपनी लुफ्थांसा एयरलाईन्सचा पायलट असल्याचं सांगून ही व्यक्ती विमानाने प्रवास करत असे. अशाच प्रकारे बनावट पायलट बनून कोलकाताची फ्लाईट पकडायला जात असताना व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजन असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो वसंत कुंज येथील रहिवासी आहे. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता बनावट पायलट बनून आतापर्यंत 15 वेळा विमानाने प्रवास केल्याची माहिती राजनने दिली आहे. तसेच असं का करत असल्याचं विचारल्यास त्याने त्यामागची काही कारणंही पोलिसांना सांगितली आहेत. विमानतळावर रांगेत उभं राहण्यापासून वाचण्यासाठी, फ्लाईटमध्ये क्रू मेंबर्सना धाक दाखवणं, हवाई सुंदरींचं लक्ष वेधून घेणं आणि सीट अपग्रेड करणं अशा कारणांसाठी बनावट पायलट होत असल्याची माहिती राजनने पोलिसांना दिली आहे.
पायलटचा गणवेश परिधान करून राजनने सोशल मीडियावर काही व्हिडीओही पोस्ट केले आहेत. सीआयएसएफने अटक करून त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. हे प्रकरण एअरपोर्टशी संबंधित असल्याने आयबी आणि स्पेशल सेलही अधिक चौकशी करत आहे. राजनचे वडिल निवृत्त ब्रिगेडियर आहेत. राजन स्वत: ला लुफ्थांनामध्ये इंस्ट्रक्टर आणि कन्सल्टंट म्हणवून सांगत. त्याने लुफ्थांसाचं बनावट ओळखपत्र बँकॉकहून खरेदी केलं होतं. त्याचा मोबाइल फोन आणि लॅपटॉपची देखील तपासणी केली जात आहे. राजनला लुफ्थांसा एअरलाईन्सच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून टर्मिनल 3 च्या बोर्डिंग गेट नंबर 52 वर अटक करण्यात आली.