नवी दिल्लीः गृहोपयोगी वस्तूंच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली रामदेव बाबांची 'पतंजली' आता दूरसंचार उद्योगात उतरतेय, 'स्वदेशी सिम' बाजारात आणून ते ग्राहकांना जगाशी जोडणार आहेत, अशी बातमी कालपासून वाऱ्यासारखी पसरतेय. यामुळे ग्राहकांच्या मनात पतंजलीच्या सिमवषीयी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, काही वेळातच हे वृत्त फसवे असल्याची बाब समोर आली. पंतजली समूहाकडून परिपत्रक प्रसिद्ध करून याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. पतंजली समूह दूरसंचार क्षेत्रात उतरत असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. आम्ही केवळ आमच्या कर्मचाऱ्यांसाठी बीएसएनएलशी करार केला होता. जेणेकरुन आमच्या कर्मचाऱ्यांनी स्वस्तात मोबाईल सेवेचा आनंद घेता येईल, असे पतंजलीकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, तोपर्यंत सोशल मीडियावर यासंबंधीच्या मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली होती. पतंजली दूरसंचार क्षेत्रात आल्यास कशाप्रकारे स्पर्धा निर्माण होईल किंवा या सिमवरून तुम्हाला असभ्य संदेश पाठवता येणार नाही, अशा भन्नाट कल्पना मिम्समध्ये पाहायला मिळत आहेत.