नवी दिल्ली : पैसे देऊन प्रसिद्ध केलेल्या बातम्यांपेक्षा (पेड न्यूज) खोट्या बातम्या (फेक न्यूज) अधिक धोकादायक असतात. अशा अपप्रवृत्तींविरोधात केंद्र सरकार व प्रसार माध्यमांनी संयुक्त लढा देण्याची गरज आहे, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी सांगितले.ते म्हणाले की, मुलांना पळवून नेणाऱ्या लोकांविषयी गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियातून झळकलेल्या खोट्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवून देशात विविध ठिकाणी जमावाने केलेल्या मारहाणीत २० ते ३० लोकांचे बळी गेलेआहेत.प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, असे कोणतेही पाऊल केंद्र सरकार उचलणार नाही. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, चित्रपटांना आहे तशी नियमावली इंटरनेटद्वारे प्रसारित होणाºया चित्रपट व अन्य कार्यक्रमांसाठीही (ओव्हर दी टॉप प्लॅटफॉर्म्स - ओटीटी) लागू करणे आवश्यक आहे.इंटरनेट किंवा आॅपरेटरच्या नेटवर्कद्वारे उपलब्ध होणाºया ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये न्यूज पोर्टल, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसारखे स्ट्रीमर यांचाही समावेश होतो.ओटीटीसाठी कोणतीही नियमावली नसल्याबद्दल मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिले होते.ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी नियमावली हवीप्रकाश जावडेकर म्हणाले की, वृत्तपत्रांसंदर्भातील बाबींचा विचार करण्यासाठी प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया ही संघटना आहे. वृत्तवाहिन्यांवर न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन ही संघटना लक्ष ठेवून असते.जाहिरातींसाठी अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्डस् कौन्सिल आॅफ इंडिया, तर चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड आहे. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्म्स व न्यूज पोर्टलना प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही.ती यंत्रणा उभारण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पेड न्यूजपेक्षा फेक न्यूज अधिक धोकादायक - प्रकाश जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 5:15 AM