जबलपूर (मध्यप्रदेश) : बनावट रेमडेसिविर इंजेक्शन्स विकल्याच्या आरोपावरून जबलपूर विश्व हिंदू परिषदेचा अध्यक्ष आणि इतर दोन जणांवर जबलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना महामारीच्या संकटात रुग्णांना वाचवण्याच्या प्रयत्नांतील त्यांच्या नातेवाईकांना एक लाखांपेक्षा जास्त ही बनावट इंजेक्शन्स विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सरबजीत सिंग मोखा, देवेंदर चौरसिया आणि स्वपन जैन अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर संबंधित कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे, असे जबलपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहित काशवाणी यांनी म्हटले. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करा, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विवेक तनखा यांनी केली आहे. सरबजीत सिंग मोखा यांच्या मालकीचे सिटी हॉस्पिटल आहे. चौरसिया हे मोखा यांचे व्यवस्थापक असून स्वपन जैन हे औषध कंपन्यांची डिलरशीप पाहतात. जैन यांना सूरत पोलिसांनी अटक केली तर मोखा व चौरसिया फरार आहेत.वरिष्ठ सूत्रांनुसार मोखा हे सरकारमधील वरिष्ठ मंत्र्याच्या मुलाच्या संपर्कात होते. त्यांनी इंदूरहून ५०० बनावट रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवली आणि स्वत:च्याच रुग्णालयातील रुग्णांना ३५ ते ४० हजार रूपयांना विकली.देशात कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी मागणी असल्यामुळे टंचाई निर्माण झालेली आहे. त्याचा फायदा उठवत काही लोक काळ्या बाजारात हे रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करीत आहेत. सरकारने इंजेक्शनचे दर जाहीर केलेले असले तरी मोठ्या पैशाच्या आमिषाने बनावट रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करून हजारो रुपयांची माया जमविणाऱ्या टोळ्या सध्या अनेक ठिकाणी कार्यरत आहेत.
५०० बनावट रेमडेसिविर इंजेक्शन्स इंदूरहून मिळवली. ३५ ते ४० हजार रुपयांना स्वत:च्याच रुग्णालयातील रुग्णांना विकली.