नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी वकील आणि याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट वेबसाइटबद्दल इशारा देत आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्यास सांगितले.फसवणुकीसाठी तयार केलेल्या बनावट वेबसाइटच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक सार्वजनिक नोटीसदेखील जारी केली. बनावट वेबसाईट तयार करणाऱ्यांनी त्यासाठीची यूआरएल सर्वत्र शेअर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटची नक्कल करणाऱ्या या वेबसाइटबाबत प्रथम सत्यता पडताळावी. त्याशिवाय कोणत्याही वेबसाइटच्या लिंकवर क्लिक किंवा शेअर करू नये, असे आवाहन केले.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बनावट वेबसाइटविषयी इशारा वकील आणि याचिकादारांना दिला.
काय म्हणाले न्यायालय?सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटची नक्कल करणाऱ्या बनावट वेबसाइटद्वारे फसवणूक झाल्याची माहिती रजिस्ट्रीला दिली.त्या माध्यमातून फसवणूक करणारे वैयक्तिक तपशील आणि गोपनीय माहिती मागत आहेत, कोणीही सदर वेबसाइटवर कोणतीही वैयक्तिक आणि गोपनीय माहिती सामायिक किंवा उघड करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने तपास यंत्रणांना सायबर फसवणुकीच्या शक्यतेचा तपास करण्यास आणि संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.
फसवणूक झाली तर काय?भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची रजिस्ट्री कधीही वैयक्तिक माहिती, आर्थिक तपशील किंवा इतर गोपनीय माहिती विचारत नाही. ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्यास, तुमच्या ऑनलाइन खात्यांचे पासवर्ड ताबडतोब बदला, ताबडतोब तुमच्या बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधा व तुमच्या झालेल्या फसवणुकीबद्दल त्यांना कळवा, असे नोटिशीत म्हटले.