पाटणा: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. हा आकडा सध्या ३३ वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात देशात पहिला ओमायक्रॉन रुग्ण आढळून आला. एका बाजूला ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यासोबतच लसीकरण मोहिमेत हलगर्जीपणा होत असल्याचे प्रकारदेखील समोर येत आहेत.
बिहारमध्ये लसीकरण अभियानात निष्काळजीपणा होत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यांपूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आल्याचा प्रकार सारण जिल्ह्यात घडला आहे. सारण जिल्हा आरोग्य विभागानं एका वृद्ध महिलेला कोरोना लसीचा दुसरा डोस दिला. लसीकरण झाल्यानंतर मोबाईलवर मेसेज आला. इतकंच नव्हे, तर लसीकरण प्रमाणपत्रदेखील जारी करण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता.
पेशानं पत्रकार असलेल्या धनंजय सिंह तोमर यांच्या आई कौशल्या देवी यांचं १६ सप्टेंबरला निधन झालं. कौशल्या देवी यांना २६ एप्रिलला छपरामधील रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. वृद्धापकाळानं आणि आजारामुळे कौशल्या देवी यांचं सप्टेंबरमध्ये निधन झालं. मात्र आता डिसेंबरमध्ये त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती उजेडात आली आहे. याबद्दल आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी हात झटकले.
अशाच प्रकारचे अनेक प्रकार देशात घडले आहेत. लस दिली गेली नसताना लसीकरण प्रमाणपत्र जारी झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. डेटा एंट्री करत असताना काही ठिकाणी चुका झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील सुत्रांनी दिली. अशा प्रकारच्या घटना खूपच कमी असल्याचंदेखील मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.