बंगळूरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानास आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोर लावला असून, सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री बनावट मतदार ओळखपत्रांवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कर्नाटमध्ये एका फ्लॅटमधून 9 हजार 746 बनावट मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. हा प्रकार गंभीर असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. कर्नाटमध्ये 9 हजार 746 बनावट मतदार ओळखपत्रे सापडली असून, ही ओळखपत्रे बनवण्यामागे आर. आर. नगर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मुनीरत्ना नायडू यांचा हात असल्याचा आरोप भाजपा नेते सदानंद गौडा यांनी केला आहे. तर या प्रकरणावरून भाजपा नाटक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. तसेच ज्या फ्लॅटमधून ही ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तो फ्लॅट मंजुळा नांजामुरी यांच्या नावे असून, त्या भाजपाच्या नेत्या असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र भाजपाने तातडीने हा आरोप फेटाळून मंजुळा नांजमुरी यांनी सहा वर्षांपूर्वीच भाजपा सोडल्याचा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
या प्रकाराविषयी मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार म्हणाले, "फ्लॅटमधून जप्त करण्यात आलेली 9 हजार 746 मतदार ओळखपत्रे पहिल्या नजरेत खरी वाटत आहेत. ही ओळखपत्रे एका छोट्या पाकीटात ठेवण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर नाव पत्ता लिहिलेला आहे. या प्रकरणी दोषींवर योग्यवेळी योग्य कारवाई केली जाईल. बंगळुरूचे आयुक्त आणि अन्य तीन निरीक्षकांना तपासासाठी पाठवण्यात आले आहे. येत्या 24 तासात या प्रकाराविषयीचे सत्य समोर येईल त्याआधारे आम्ही योग्य निर्णय घेऊ."