लखनऊ : बहुजन समाज पार्टी (बसपा) सोशल मीडियापासून अलिप्त असल्याचे दिसत आहे. मात्र, सध्या सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या पोस्ट बसपासाठी डोकेदुखी ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बसपाच्या उमेदवारांची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यावर पार्टीला खुलासा द्यावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा पार्टीच्या प्रमुख मायावती यांचा व्हॉट्सअॅप नंबर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच, बसपा युवा मोर्चाच्या संघटनेची बातमी व्हायरल होत आहे.
याप्रकरणी बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर.एस. कुशवाहा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आर. एस. कुशवाहा म्हणाले की, 'सोशल मीडियात व्हायरल होणारा व्हॉट्सअॅप नंबर हा मायावती यांचा नाही आहे. हा नकली नंबर विरोधकांकडून जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात येत आहे'. तसेच, बसपा युवा मोर्चाचेही आर. एस. कुशवाहा यांनी खंडन केले आहे. युवा संघटना, विद्यार्थी संघटना आणि महिला संघटना अशा कोणत्याही प्रकारच्या संघटना बसपा पार्टीमध्ये तयार करण्यात आल्या नाहीत. सोशल मीडियात यासंबंधी व्हायरल होणारे पत्र खोटे आहे, असे आर. एस. कुशवाहा यांनी सांगितले.
दरम्यान, याआधीही सोशल मीडियात बसपा प्रदेशाध्यक्ष आर. एस. कुशवाहा यांचे नकली पत्र व्हायरल झाले होते. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बसपाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. याप्रकरणी आर. एस. कुशवाहा यांनी लखनऊमधील गौतम पल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.