नवी दिल्ली - पतीवर करण्यात येणारे खोटे आरोप त्याच्या मानसिक त्रासाचे कारण ठरतात असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आपल्या पतीला वारंवार आत्महत्या करण्याची धमकी देणा-या पत्नीसोबत राहणं धोकादायक असल्याचंही उच्च न्यायालयाने यावेळी नमूद केलं. विभक्त झालेल्या दांपत्याच्या घटस्फोटाला अनुमती दिल्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवताना उच्च न्याललयाने हा मुद्दा मांडला. पत्नी पतीसोबत अत्यंत क्रूरतेने वागत असल्या कारणाने न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं.
न्यायालयाने यावेळी सांगितलं की, 'आम्ही आतापर्यंत केलेल्या निरीक्षणानुसार अशा प्रकारचे विवाहबाह्य संबंधांचे खोटे आरोप पतीसाठी मानसिक त्रासाचं कारण ठरतात'.
न्यायाधीस सिद्धार्थ मृदूल आणि दिपा शर्मा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी नमूद केलं की, 'असे आरोप गंभीर असतात आणि यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. अशा गोष्टीमुळे संबंधित व्यक्तीला फार मोठा धक्का बसतो. सोबतच शंका निर्माण होते की, अशा पत्नीसोबत राहणं धोकादायक आहे. खासकरुन जेव्हा ती आत्महत्या करण्याची धमकी देते'. महिलेने आपल्या पतीचे आपल्या बहिणीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला होता.