ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - फेसबुकच्या फ्री बेसिक्स किंवा एअरटेल झीरोसारख्या योजनांवर बंदी आणत दूरसंचार नियामक मंडळाने (टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी) नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने कौल दिला आहे. इंटरनेटचा दर स्थल, काल अथवा कुठल्याही कारणाने भिन्न असता कामा नये असे बजावत तसे केल्यास सेवा पुरवणा-या कंपन्यांना दरदिवशी ५० हजार रुपयांचा व कमाल ५० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल असे ट्रायने स्पष्ट केले आहे.
कुठल्याही सेवा पुरवणा-या कंपनीने कुठली माहिती पुरवतो यावर आधारीत भिन्न किमती आकारता कामा नयेत असे ट्रायने स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅप किंवा टि्वटरसाठी ठराविक किमतीत डेटापॅक अशा स्वरुपाची ऑफर यापुडे कुणाला देता येणार नाही.
अर्थात, ज्यावेळी आणिबाणीसारखी परिस्थिती असेल आणि सार्वजनिक हित महत्त्वाचे असेल त्यावेळी अशी स्वस्त सेवा अपवाद म्हणून देता येणार आहे. अर्थात, त्यासाठी ट्रायला पूर्वसूचना द्यावी लागणार आहे.
नव्या नियमांची पूर्तता करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
फेसबुक व ज्या कंपन्यांनी वेगवेगळ्या दरांच्या सेवा पुरवल्या आहेत, त्यांच्यासाठी हा मोठा झटका मानण्यात येत आहे. विशेष म्हणजे देशभरातल्या वृत्तपत्रांमध्ये प्रचंड जाहिराती देत फ्री बेसिक्स कसं चांगलं आहे फेसबुकने पटवण्याचा प्रयत्न केला होता, जो निष्फळ ठरला आहे.
ट्रायच्या या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे.
Indian National Congress welcomes the decision of TRAI to negate differential data pricing & ensuring #NetNeutralitypic.twitter.com/8dKnZAbG5i— Randeep S Surjewala (@rssurjewala) February 8, 2016