आग्रा - वाहनांच्या वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या उत्तर प्रदेशच्या आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे चे आज धावपट्टीमध्ये रुपांतर झाले आहे. एरवी या रस्त्यावरुन सुसाट वेगाने वाहने पळतात पण आज या एक्सप्रेस वे वर भारतीय हवाई दलाच्या अत्याधुनिक फायटर विमानांच्या लँडिंग आणि उड्डाणाचा सराव सुरु आहे. युद्धाच्या परिस्थितीत रस्त्यावर विमान उतरवण्याची वेळ आल्यास त्याचा सराव असला पाहिजे त्यासाठी या एक्सप्रेस वे चे रनवे मध्ये रुपांतर करण्यात आले आहे.
भारतीय हवाई दलाने 'C-130 सुपर हर्क्युलिस' हे महाकाय मालवाहतूक विमान एक्सप्रेस वे वर उतरविले. एकप्रकारे हवाई दलाने या विमानाचे यशस्वी लँडिंग करुन दाखवण्याचा पराक्रम केला. 900 कोटी रुपये या विमानाची किंमत आहे. या विमानाच्या लँडिंगने सरावाला सुरुवात झाली. मंगळवारच्या या सरावात हवाई दलाची एकूण 16 विमाने सहभागी होणार आहेत.
'C-130 सुपर हर्क्युलिस' धावपट्टीवर उतरल्यानंतर त्यातून हवाई दलाचे गरुड कमांडो उतरले. या सरावासाठी आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे च्या काही भागामध्ये 20 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे वर उन्नाव जिल्ह्याजवळ एअर स्ट्रिप आहे. तिथे लढाऊ विमाने लँडिंग आणि उड्डाणाचा सराव सुरु आहे.
मिराज 2000, जॅग्वार, सुखोई 30 आणि एएन-32 ही विमाने एक्सप्रेस व लँडिंग आणि उड्डाण करणार आहेत. मागच्यावर्षीही याच एक्सप्रेस वे वर विमानांनी उड्डाण आणि लँडिंगचा सराव केला होता. मागच्यावर्षी आठ लढाऊ विमाने इथे उतरली होती. आपातकालीन परिस्थिती रस्त्यावर विमान उतरवण्याची वेळ आल्यास त्याचा सराव असला पाहिजे त्यासाठी या एक्सप्रेस वे ची निवड करण्यात आली आहे.