नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने तीन आठवड्यांचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात तो तीन महिन्यांपर्यंत सुरू राहील, अशा आशयाच्या खोट्या बातम्या व अफवांचे देशभर पेव फुटणे हे परराज्यांमध्ये मोलमजुुरी करणाऱ्या लाखो स्थलांतरित मजुरांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याचे मुख्य कारण होते. त्यामुळेच ते जीव धोक्यात घालून शेकडो कि.मी. चालत घरी जायला निघाले.
परिणामी त्यांचे अतोनात हाल झाले व त्यांच्यापैकी काहींना हकनाक प्राणही गमवावा लागला, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. याविषयी केलेल्या दोन जनहित याचिकांवर सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने दिलेले आठपानी आदेशवजा निकालपत्र मंगळवारी रात्री न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले.
देशावर घोर आपत्ती आलेली असताना वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमांतून पसरलेल्या खोट्या बातम्या व अफवांमुळे उडालेला हाहाकार मूळ आपत्तीएवढाच गंभीर असल्याने तो दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. म्हणून सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा व अन्य कायद्यान्वये याचा वेळच्या वेळी व कठोरपणे बंदोबस्त करायला हवा, असे न्यायालयाने नमूद केले.
माध्यमांच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करण्याची आमची इच्छा नाही; परंतु त्यांनी हे स्वातंत्र्य उपभोगताना ज्यायोगे लोकांमध्ये सर्वदूर घबराट पसरेल अशा सांगोवांगी माहितीवर आधारित बातम्या प्रसारित होण्याचे टाळून आपल्या जबाबदारीचे गांभीर्याने भान ठेवावे. महामारीच्या अनुषंगाने सर्व प्रकारची साधक-बाधक चर्चा जरूर करावी, पण त्याचबरोबर सरकारकडून दिल्या जाणाºया अधिकृत माहितीसही ठळकपणे स्थान द्यावे. यासाठी सर्व माध्यमांतून एक दैनंदिन बुलेटिन काढण्याची व्यवस्था सरकार करीत आहे. माध्यमांनी त्याचा जरूर उपयोग करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्देशानुार माध्यम सूचना विभागाने बुधवारी कोविड-१९ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधी बुधवारी दैनंदिन वार्तापत्र जारी केले.
खोट्या बातम्या विषाणूंहून घातक'
खोट्या बातम्या व अफवांमुळे कसा भयंकर हाहाकार होऊ शकतो याचा संदर्भ देताना न्यायालयाने जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. तेद्रॉस अॅधेनॉम घेब्रेयेसस यांचे एक ताजे वक्तव्य उद््धृत केले. ते असे, ‘आपण सध्या फक्त एका साथीलाच नव्हे, तर त्यासंबंधात पसरविल्या जाणाºया (चुकीच्या) माहितीच्या महापुरालाही सामोरे जात आहोत. खोट्या बातम्या विषाणूपेक्षाही अधिक वेगाने व सहजपणे पसरतात व त्या विषाणूंएवढ्याच घातक असतात.’